रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपचाच आहे. पक्षाने आपणास उमेदवारी दिल्यास आपण या मतदारसंघात लढणार आणि जिंकणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. यामध्ये कुणी लुडबुड करू नये, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे शिवसेनेला दिला आहे.
आज (बुधवारी) या मतदारसंघात पक्षाचे नेते उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहेत आणि आपण स्वत: बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही त्यांनी कडवी टीका केली.
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची जी सभा झाली, त्याबाबत त्यांनी टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे सुरुवातीला स्पष्ट करत इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार लढेल. मी माधार घेतलेली नाही. मी कुणाशी बोललो नाही. माझ्याबद्दल नेत्यांना बोलायला गेलो नाही. बाकीच्यांशी बोलायचे सोडा. तो माझा गुणधर्म नाही. आयुष्यात इतकी पदे मिळाली, ती न मागता मिळाली आहेत.
मला कुणीही विचारलेले नाही. मात्र, माझे नाव भाजपने जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आज जाहीर केली. उदय सामंत यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, बैठक घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आम्हीही उद्या बैठक बोलावली आहे.
आमच्या कोकणात दहीकाले असतात, त्यात उदयचा दहिकाला तिकडे आणि आमचा इकडे आहे. परंतु संकासुर कोण आहे, हे मला माहीत नाही. आमची कोकणात ताकद आहे म्हणून हा मतदारसंघ आम्ही सोडणार कसा? असा सवाल त्यांनी केला. तिथे सध्या असलेला खासदार विनायक राऊत हे शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत का? असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती भाजपच्या आहेत. जिल्हा बँक भाजपची आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपचीच आहे. शिंदे शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवारी दिली गेली तर काय भूमिका असेल? यावर, भाजप नेहमी युती धर्म पाळतो.
मी कुठेही असलो तरी 99 टक्के नाही, तर 100 टक्के असतो. शिंदे शिवसेनेला उमेदवारी दिली गेली तर आपण आदेशाचे पालन करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले. भाजपकडे डझनभर क्षमता असलेले उमेदवार आहेत. कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्याचे काम करू, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
उद्या आपण सिंधुदुर्गात जावून शक्तीप्रदर्शन करणार का? किंवा प्रचाराचा नारळ फोडणार का? असा सवाल केला असता राणे यांनी पक्षाचे आदेश आल्यावरच नारळ फोडू तोवर नाही, असे सांगितले.