नरेंद्र मोदी देणार ‘गुरूमंत्र’ ; 11 जूनला भाजप मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक

Photo of author

By Sandhya

नरेंद्र मोदी

लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे धोरण ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये मॅरेथॉन बैठकांचे अखंडित सत्र सुरू आहे. याच मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 11 जून रोजी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे.

सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीच्या फुल मूडमध्ये आला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. यामुळे, भाजपमध्ये बैठकांमागून बैठका बोलाविल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 11 जून रोजी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलाविली आहे. यात लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

महत्वाचे म्हणजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना खास करून बोलाविण्यात आले आहे. यामुळे मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीवर विशेष चर्चा होणार आहे. भाजपशासित या राज्यात नोव्हेंबरपूर्वी विधानसभेची निवडणूक होणे आहे.

आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि त्या योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहचत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासोबतच या योजनांचा प्रचार-प्रसार जोमात करण्याची भाजपची योजना आहे.

भाजपने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती देवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय काय केले जावू शकते? यावर चर्चा केली जाणार आहे.

Leave a Comment