National Startup Day 2026: Maharashtra honoured in ‘Leaders’ category in Startup Rankings. Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangal Prabhat Lodha congratulated Maharashtra State Innovation Society.


भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) आणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ निमित्त पाचव्या स्टेटस स्टार्ट अप इकोसिस्टीम रँकिंग अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लीडर्स श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्टार्ट - अप इंडिया इनिशीएटीव्हच्या दहा वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात देशातील स्टार्टअप परिसंस्थेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवस्थापक (स्टार्टअप्स व नावीन्यता) अमित कोठावदे व विवेक मोगल यांनी स्वीकारला.
स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, स्टार्टअप्ससाठी सक्षम इन्क्युबेशन व अॅक्सेलरेशन सुविधा, भांडवली प्रवेश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भागीदारी, जिल्हास्तरापर्यंत पोहोचलेले उपक्रम तसेच सर्वसमावेशक स्टार्टअप सहभाग या निकषांवर महाराष्ट्राने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत स्थान देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्य शासनाने उभारलेली संस्थात्मक यंत्रणा, विविध विभागांतील समन्वय आणि स्टार्टअप परिसंस्थेतील सर्व घटकांचे योगदान यामुळे महाराष्ट्राने देशात आपले नेतृत्व कायम राखले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हा सन्मान महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, उद्योजक, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि धोरणकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.