भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. परंतु यातच आता नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे. काय म्हणाले नितेश राणे?
फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका. माझ्या सहकार्यांनी एक शपथ घेतली पाहिजे. मी जो काही व्यवहार करेल, तो फक्त हिंदूंशीच करेल, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका केली. याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सत्ताधारी एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटले.
वादग्रस्त मालिकेचे सत्र सुरुच दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. रामगिरी महाराजांवरुन सुरु झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती. तर सांगलीत लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पोलिसांना बदलीची धमकी देत ‘अशा जिल्ह्यात बदली करणार की बायकोचाही फोन लागणार नाही’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा नितेश राणे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.
दरम्यान, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य आणि दुसरीकडे त्यांच्याच महायुतीतील आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं आहे. यामिनी जाधव या शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार आहेत. यावरूनही आता चर्चांना उधाण आले आहे.