
नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांचा सर्व जाती-धर्माच्या लोकांना लाभ झाला. उत्तम शैक्षणिक संस्था आल्या, मिहानमध्ये उद्योग आलेत. इतर धर्मांप्रमाणे मुस्लिम समाजाचे तरुणही त्याठिकाणी चांगले शिक्षण घेत आहेत, रोजगार मिळवत आहेत.
यात आणखी भर पडावी आणि मुस्लिम समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे, असे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी काढले.
दक्षिण नागपुरात मोठा ताजबाग येथे गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, मोहसीन जाफर खान, साहेब खान, तन्वीर अहमद, मुस्तफा टोपीवाला, रशीद काझी,
अश्रफ खान, इम्रान ताजी, मोबिन ताजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ताजबागमध्ये संत ताजुद्दीन बाबांच्या नावाने मोठे हॉस्पिटल उभारण्याची योजना आहे. ताजबागचा विकास करताना कुणाचेही घर, हॉटेल तोडले जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
१४ हजार मुले इंजिनिअर माझ्या कोट्यातून एक इंजिनिअरींग कॉलेज मिळाले होते. मी स्वतःचे कॉलेज सुरू करू शकलो असतो. पण ते काम काँग्रेसच्या नेत्यांचे आहे.
मी माझ्या कोट्यातील कॉलेज अंजूमन इस्लाम सोसायटीला दिले. आज त्याच कॉलेजमधून १४ हजार मुस्लिम मुले इंजिनिअर झाली, असेही गडकरी यांनी सांगितले.