
बीड : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या मतदार संघातील विकास कामांची पहाणी करताना आमदार धनंजय मुंडे दिसून आले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या २८६ कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहणी केली.
मंदिर परिसरात भव्यदर्शन मंडपाचे काम सुरू असून आता चौथ्या मजल्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी Glass Re-In-Forced काँक्रीट पद्धतीने काम पूर्ण करावे, दगडी पायऱ्यांचे काम तसेच परिसरातील अन्य वस्तूंच्या कामाच्या संदर्भात पुरातन महत्व जपून तसेच दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जावे अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २८६.६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून यातून आतापर्यंत एका भव्य अशा भक्त निवासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रदक्षिणामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून, भव्य असे प्रवेशद्वार दगडी पायऱ्या दर्शन मंडप अशी कामे सध्या सुरू आहेत. मंदिर परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्व जपण्याबरोबरच दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत काम पूर्ण करावेत अशा सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधितांना केल्या.
बीडच्या मस्साजोगचे सरपंंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तसेच खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेला Walmik Karad हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांनी विधानसभेच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचदरम्यान धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांंच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. त्यामुळे, विरोधकांच्या प्रचंड दबाव आणि आक्रमकतेमुळे धनंजय मुंडे यांना नाईलाजाने आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.