online fraud : सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दहा लाखांचा ऑनलाइन गंडा

Photo of author

By Sandhya

online fraud : सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दहा लाखांचा ऑनलाइन गंडा

आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आयकर परताव्याबाबत बोगस ई-मेल पाठवून सुमारे दहा लाख रुपयांना ऑनलाइन पद्धतीने गंडा घालण्यात आला. याबाबत उत्तमराव महादेव चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आगाशिवनगर (मलकापूर) येथील उत्तमराव चव्हाण हे एका खासगी कंपनीत कामास होते. ते सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या बॅंक खात्यावर भविष्य निर्वाह निधीचे दहा लाख रुपये जमा झाले होते.

दरम्यान, सोमवार, दि. 8 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उत्तमराव चव्हाण यांच्या ई-मेल आयडीवर आयकर परताव्याबाबत मेल आला. सदरचा मेल वाचल्यानंतर परताव्याबाबत आयकर विभागाने माहिती मागविली असावी, असा समज उत्तमराव चव्हाण यांचा झाला.

त्यावेळी उत्तमराव व त्यांच्या सुनेने मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार एका ऑनलाइन फॉर्मवर बॅंक खात्याची माहिती, तसेच इतर वैयक्‍तिक माहिती भरली. ही माहिती भरुन त्यांनी तो फॉर्म ऑनलाइन सबमीट केला. त्यानंतर अचानक आयकर संदर्भातील एक ऍप्लिकेशन उत्तमराव चव्हाण यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाले. तसेच चोवीस तासासाठी मोबाईल पडताळणीत राहिल, मेसेज त्यांना आला.

आयकराबाबत आपण भरलेल्या माहितीची खातरजमा केली जात असावी, असा समज झाल्यामुळे चव्हाण यांच्यासह कुटूंबियांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तमराव यांनी त्यांचे बॅंक खाते तपासले असता त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने अज्ञाताने 9 लाख 93 हजार रुपये दोन टप्प्यात काढल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे उत्तमराव चव्हाण यांनी तातडीने बॅंकेत जाऊन चौकशी केली असता अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने हे पैसे काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे उत्तमराव चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.

Leave a Comment