संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात विरोधकांचा आक्रमक आरोप, ‘वाल्मिक कराडला अटक करा’ मागणी

Photo of author

By Sandhya

नागपूर : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं…

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी औचित्याच्या मुद्याच्या आधारे आवाज उठवला. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी देखील हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं. तर, नाना पटोले यांनी परभणी आणि बीड प्रश्नी सरकार गंभीर नसल्यानं विरोधक सभात्याग करत असल्याचं म्हटलं. संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली. तर, नमिता मुंदडा यांनी सरपंच संतोष देशमुखचे डोळे जाळण्यात आल्याचं सभागृहात सांगितलं.
बीड जिल्ह्यात भयानक गोष्ट झाली. संतोष देशमुख नावाच्या संरपंचाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्या मागील मास्टरमाईंडचा शोध लागलेला नाही. वारंवार एक सदस्य म्हणून तक्रारी करत आहे, त्याचं नाव वाल्मिक कराड असं आहे. मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला आहे. आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड मिळतो, क्रिमीनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कसे मिळतात, असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी केला.
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही. जे गुन्हेगार सापडले आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराड याचे कॉल रेकॉर्ड जर सापडले, सीडीआर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला ते समोर येईल. गडचिरोली जिल्हा चॅलेंज म्हणून घेता तसा बीड जिल्हा चॅलेंज म्हणून घ्या, गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यात वाढत आहे त्यावर आळा घाला, असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
जनतेमध्ये, जिल्ह्यात इतका रोष आहे, हे अधिवेशन संपेपर्यंत जर वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात मोठा मोर्चा निघणार असल्याचं संदीप क्षीरसागर म्हणाले. नाना पटोले म्हणाले, संदीप क्षीरसागर यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. बीड आणि परभणीच्या घटनेबाबत सरकार गंभीर नाही त्यामुळं सभात्याग करतो.
आरोपींना फाशी द्या : नमित मुंदडा
केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचा दोनवेळा सरपंच होता. हे प्रकरण माझ्या मतदारसंघातील आहे, असं म्हटलं. देशमुखनं चांगलं काम केलं होतं, लोकप्रतिनिधी असून त्याचं राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करण्यात आलं. अवघ्या दोन तीन तासात त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. त्याचे डोळे जाळण्यात आले, पकडून पकडून मारण्यात आलं, असं नमिता मुंदडा म्हणाल्या.
9 डिसेंबरला हत्या झाली आज 17 डिसेंबर आहे ,8 दिवस झाले, 7 आरोपींपैकी 3 आरोपी सापडले आहेत. ज्यानं हत्या केली तो मुख्य आरोपी सापडलेला नाही तो फरार आहे. अध्यक्षमहोदय सगळ्या लोकांना पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जिल्ह्यात लोकं घाबरली आहेत, जिल्हा बंद केलेला होता. सगळ्या 7 लोकांना पकडून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page