पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घरावर हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.११) पहाटे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या ५०० हून अधिक लोक पंतप्रधानांच्या मॉडेल टाऊन लाहोर निवासस्थानी पोहोचले आणि तेथे उभी असलेली वाहने जाळली.
इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. इम्रान खान समर्थक कमालीचे आक्रमक बनले असून, ते सर्वत्र जाळपोळ करत सुटले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्ला केला. ‘आयएसआय’च्या परिसरात जाळपोळ केली.