पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्यात 12 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वात जिल्ह्यात सोमवारी रात्री एका पोलीस ठाण्यावर बॉम्बस्फोट करण्यात आला.
या पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी विभागाचे कार्यालय आहे. स्वात जिल्ह्याच्या कबाल प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागावर हा हल्ला झाला आहे. यावेळी पोलीस स्टेशनमध्येच दोन स्फोट झाले.
अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. परंतु पाकिस्तानी तालिबान या संघटनेने पाकिस्तानच्या सरकारसोबत पुन्हा युद्ध पुकारत असल्याचं म्हणत अशा हल्ल्याची धमकी दिली होती.
या स्फोटामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून अनेक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्वातमधील लक्की मरवत या भागात दहशतवाद विरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यात एका पोलिसाचा त्यात मृत्यूही झाला होता.
या घटनेच्या काही तासांनीच हा स्फोट झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केल आहे. तसेच हल्लेखोरांचा निषेध केला आहे. शरीफ यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हंटलं आहे. तसेच या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.