
देवालाही थंडी वाजते… थंडीमुळे पंढरपूरच्या विठोबास बांधली जाते कानपट्टी, अंगावर घातली जाते शाल
कार्तिक पौर्णिमेपासून वसंत पंचमीपर्यंत कानपट्टी
पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात थंडी चालू आहे. पंढरपूरमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन यामुळे विस्कळीत झालेले आहे. याच थंडीच्या काळात प्रत्यक्ष देवालाही थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सुती कापडाची कानपट्टी बांधली जाते आणि अंगावर शाल दिली जात आहे.
पंढरपूरचा विठोबा हा दक्षिण भारतातील एक प्रमुख दैवत आहे. दररोज या देवाच्या दर्शनासाठी एक लाखावर भाविक येत असतात. लोकदेव मानल्या जाणाऱ्या विठोबाचे नित्योपचार ही सामान्य भविकांप्रमाणेच ऋतुमानाप्रमाणे बदलत असतात. उन्हाळ्यात चार महिने उन्हापासून देवाला त्रास होऊ नये म्हणून विठोबाच्या मूर्तीला चंदन उटी लावली जाते.
देवाला थंडीचा त्रास होऊ नये यासाठी कान पट्टी बांधली जाते. देवालाही आपल्याप्रमाणे हिवाळ्याचा त्रास होतो अशी
मनमोहक रुपडे खुलून दिसते हिवाळ्यातील या पोषाखामुळे थंडीपासून देवाचा बचाव होतो, अशी मान्यता आहे. सावळा वर्ण असलेल्या विठोबाचे मूळ रूप अतिशय सौम्य आणि गोंडस आहे, त्यावर कानपट्टी बांधून अंगावर शाल दिल्यानंतरच देवाचे रूप अतिशय लोभस दिसते.
हिवाळ्यात कार्तिकी पौर्णिमेपासून ते वसंत पंचमीपर्यंत कानपट्टी
हिवाळ्याच्या काळात विठोबास अडीच मीटर लांब, पांढऱ्या सुती करवत काठी उपरण्याची कानपट्टी लावली जाते. दररोज रात्री आकरा वाजता देवाची शेजारती केली जाते. त्यानंतर एक आणि पहाटे काकड आरती नंतर एक कानपट्टी बांधली जाते. त्याच वेळी देवाच्या अंगावर शालही घातली जाते. विठोबाची अर्धागिनी असलेल्या रुक्मिणी मातेच्या अंगावर ही याच दरम्यान शाल घातली जाते.
विठ्ठल हा लोकदेव आहे, त्याच्यात आणि भक्तांच्या मध्ये कसलेही अंतर नाही. वारकरी संतानी तर विठ्ठलाला मानवी पातळीवर आणून प्रेमभक्तीची भावना समाजात रुजवली. हा देव भक्तांच्या मध्ये रमतो, त्यांच्या सारखाच राहतो ही धारणा संतांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीचा त्रास होतो, या प्रकारची भावना वारकरी भक्तात आहे. देवाला थंडी वाजत असल्याने त्याला कान पट्टी बांधणे हा या विठ्ठलाच्या परंपरेचा भाग मानता येईल.