पंढरपूर : पंढरपुरच्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालयातील शौचालये संबंधित प्रशासनाकडून कुलूप लावून बंद केल्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. याविरूध्द आता पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक गणेश अंकुशराव हे आक्रमक झाले असुन मोठ्या जनआंदोलनाच्या तयारीत आहेत.
यासंदर्भात गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे अधिक माहिती दिली आहे. उपजिल्हा रूग्णालयातील सध्या सेवेत असलेले अधिकारी हे अतिशय बेजबाबदारपणे रुग्णांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत. पाणी नसल्याचे कारण सांगून रूग्णालयातील सर्व शौचालयांना यांनी टाळे लावले असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना, विशेषतः महिलांना सुध्दा शौचालय उपलब्ध नसल्याने चक्क चंद्रभागेच्या पात्रात जावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक व संतापजनक बाब असल्याने आम्ही वारंवार यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनं दिली तरीसुद्धा हा प्रश्न सुटला नाही.
एकीकडे महिला भगिणींचा सन्मान झाला पाहिजे, महिला सशक्त झाल्या पाहिजेत, महिलांसह सर्वसामान्य जनतेला त्यांचे सर्व अधिकार मिळायला हवेत, यासाठी शासन विविध योजनांद्वारे प्रयत्न करत असतानाच भुवैकुंठ पंढरीत अशा पध्दतीने महिला भगिणींची, सर्वसामान्य रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होतेय, रुग्णालयात पाणीच उपलब्ध नसल्याने ऑपरेशन करण्यासाठी सुध्दा अडचणी येत आहेत. ही बाब गंभीर असून लाडक्या बहिणींच्या पाठबळावर सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच आता याकडे लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे, खासदार प्रणितीताई शिंदे यांनीही याकडे लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा , अन्यथा आम्ही येथील रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना , भाविकांना व आमच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सदर रूग्णालयातील बेजबाबदार अधिका-यांच्या केबीनमध्ये शौचास बसवू आणि मोठे जनआंदोलन करु.
असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला.