भक्कम परिपूर्ण विकासाने देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून आमच्या सरकारने बाहेर काढले आहे. ‘गरिबी हटाव’ही फसवी घोषणा राहिलेली नाही, तर ही ‘मोदी गॅरंटी’ झाली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
येणार्या काळात देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी देशभरात घरोघरी रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील रे नगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी 15 हजार 24 घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, रे नगरचे प्रवर्तक, माजी आ. नरसय्या आडम उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, सोलापुरातील रे नगरमधील या गृहप्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो.
त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण करून घरांची किल्ली सुपूर्द करण्यासही मीच येणार असल्याची गॅरंटी दिली होती. तो शब्द मी पाळला. हीच ‘मोदी गॅरंटी’ असल्याचे त्यांनी सांगितले.