पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे का होईना, पण पुणेकरांना स्वच्छता, फ्लेक्‍समुक्‍त रस्ते, खड्डेमुक्त रस्त्यांची अनुभूती मिळणार

Photo of author

By Sandhya

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे का होईना, पण पुणेकरांना स्वच्छता, फ्लेक्‍समुक्‍त रस्ते, खड्डेमुक्त रस्त्यांची अनुभूती मिळणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात खड्डे, अस्वच्छता, जागोजागी अतिक्रमणे आणि विद्रूपीकरणामुळे पुणेकर त्रस्त झाले असूनही, महापालिकेकडे याबाबत सातत्याने तक्रारी वाढत आहेत. मात्र, पुणेकरांसाठी वेळ नसलेल्या महापालिकेने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी शहरातील मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांची कामे तातडीनं हाती घेतली आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या मार्गावर तसेच इतर संभाव्य मार्गावर महापालिकेने स्वच्छता, अतिक्रमण कारवाईसह कुठेही चिखल राहणार नाही, याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे का होईना, पण पुणेकरांना स्वच्छता, फ्लेक्‍समुक्‍त रस्ते, खड्डेमुक्त रस्त्यांची अनुभूती मिळणार आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी एका दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.

यात सकाळी ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेतील. त्यानंतर त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम एस.पी. महाविद्यालय मैदानावर असेल.

त्यानंतर दुपारच्या सुमारास पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीएच्या आवास योजना तसेच भूमिपूजनाचा जाहीर कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर होणार आहे.

त्यामुळे या तीनही ठिकाणच्या परिसरासह, त्यांचा मुख्य मार्ग, पर्यायी मार्ग तसेच आसपासच्या भागात महापालिकेकडून तातडीनं कामे सुरू केली आहेत.

पोलिसांचे महापालिकेस पत्र पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी महापालिकेस पत्र पाठवले असून दौरा मार्गावरील सर्व असुविधा तातडीनं दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यात रस्ते दुरुस्ती, रस्त्यावरील कचराकुंड्या काढणे, झाडांच्या फांद्या काढणे, मार्गावरील अतिक्रमणे काढणे, पदपथ दुरूस्ती, धोकादायक खांब, विद्युत तारा काढणे, मार्गावरील बोर्ड, फ्लेक्‍स, जाहिराती काढणे अशा सूचना महापालिकेस करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment