पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौर्‍यावर; प्रशासनाकडून तयारी

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौर्‍यावर

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौर्‍यावर येत असून, त्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात असून, त्यासंदर्भात अधिकार्‍यांची बैठक झाली.

हवामान विभागापासून केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी, सुरक्षा व्यवस्थेचे अधिकारी आणि इतर व्यवस्थापन विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाकडून याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. अद्याप पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याची वेळ निश्चित नसली, तरी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि शहरातील इतर विकासकामांचा शुभारंभ आदी कार्यक्रम मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासकीय पातळीवर पोलीस विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम स्थळी सुरक्षाव्यवस्था, निमंत्रितांची माहिती, उपस्थितांची संख्या, अधिकार्‍यांची पाहणी त्या अनुषंगाने माहिती मागविण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी हवाई मार्ग, रस्ते मार्ग, हेलिपॅड आदी व्यवस्था करण्यात येणार असून,

याची तपासणी करून अहवाल पाठविल्यानंतर सुरक्षा यंत्रणेकडून तपासणीअंती हवामान विभागाकडून पावसाचा-वातावरणाचा अंदाज घेऊन वेळ ठरवून पंतप्रधान मोदी यांचा दौरा निश्चित होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Comment