छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची गरज आहे. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी आहे. त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
दरम्यान, महाराष्ट्रातील मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी सकारात्मक विचार करून लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्याचबरोबर लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या उद्घाटनासाठी निमंत्रीत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल.
तसेच महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक असल्याचे चर्चेदरम्यान खा. उदयनराजे भोसले यांनी ना. मोदी यांना सांगितले.
मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गुंतागुंतीचा आणि गंभीर होत चालला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष लक्ष घालून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा. अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली.