पंतप्रधान नरेंद्र मोदी : मजबूत सरकारमुळेच दहशतवाद्यांचा खात्मा…

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश सुरक्षित ठेवायचा असेल तर सरकार मजबूत हवे. आपले सरकार मजबूत आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांना त्यांच्याच देशात घुसून कंठस्नान घातले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

उत्तराखंडमधील प्रचारादरम्यान ऋषीकेश येथील जाहीर सभेत त्यांनी संरक्षणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारने घातलेल्या गोंधळाबाबतही जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा जेव्हा देशात कमकुवत सरकार असते, तेव्हा देशाचे शत्र्ाू त्याचा फायदा घेतात. पण देशात जेव्हा मजबूत सरकार असते तेव्हा दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून कंठस्नान घातले जाते. आज देशात मजबूत सरकार आहे.

त्यामुळेच सीमेवरच्या संघर्षग्रस्त भागात भारताचा तिरंगा ही सुरक्षेची गॅरंटी ठरत आहे. काँग्रेसच्या ढिसाळ धोरणावर हल्ला चढवत पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळात आपल्या जवानांकडे बुलेटप्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा साधनेही नव्हती. शत्रूच्या गोळ्या झेलण्यासाठी आपल्या लढवय्या जवानांना सोडले जायचे.

पण भाजप सरकारने संरक्षण हा प्राधान्याचा विषय बनवला. आज आपल्या जवानांकडे भारतातच बनलेली बुलेटप्रूफ जॅकेटस् आहेत. आज भारतात अत्याधुनिक रायफली तयार केल्या जातात, लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते, विमानवाहू नौका तयार केल्या जातात. हे सारे भारतातच तयार होते.

भाजप सरकारने सीमेवरील पायाभूत सुविधा अत्याधुनिक केल्या, रस्ते बांधले, टनेल बांधले आणि त्या माध्यमातून सुरक्षा व विकासाला चालना दिली. काँग्रेस विकासविरोधी पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस हा विकासविरोधी पक्ष आहे. मानसन्मान वाढवणार्‍या गोष्टींना त्यांचा सतत विरोध असतो.

प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. राम मंदिरालाही विरोध केला, मंदिराच्या कामांत अनंत अडथळे आणले. एवढे करूनही आम्ही मोठ्या मनाने काँग्रेसला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले.

पण त्यावरही त्यांनी बहिष्कार घातला. काँग्रेसच्या नेत्यांचे एकाच बाबीला प्राधान्य असते, ते म्हणजे त्यांचे दिल्लीतील शाही कुटुंब आणि त्यानंतर आपले कुटुंब. पण मोदीसाठी हा देशच कुटुंब आहे.

काँग्रेसच्या काळात लोकांच्या हक्काचा विकासाचा पैसा मधले दलालच खाऊन टाकत होते. पण आता लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यांत मिळतात. ही लूट मोदीने बंद केली म्हणून विरोधकांचा संतापाने तीळपापड झाला आहे, असा टोलाही मोदी यांनी लगावला.

Leave a Comment