राज्यातील आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात आता भाजपचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी उडी घेतली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असता पोलिस भरती व इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत,
त्याचे पुरावे असलेले अनेक पेन ड्राईव्ह भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सोबतच वैद्यकीय कारणावरून बाहेर असलेल्या देशमुखांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दोन दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी दबाव टाकला होता.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चार नेत्यांच्या विरुद्ध खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास आपणास सांगितले होते, असा आरोप देशमुख यांनी केला होता.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध काय बोलले त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांना इशारा दिला होता. यास देशमुखांनी लगेच उत्तर दिले.
तुमच्याकडे असलेला पेन ड्राईव्ह जगजाहीर करावा असे आव्हान त्यांनी दिले. सोबतच फडणवीस व भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचे पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी भाजपला कोंडीत पकडले होते. यात आता आमदार फुके यांनी उडी घेतली आहे.
अनिल देशमुख वैद्यकीय कारणावरून जामिनावर आहेत. ते पुरावे नष्ट करून शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी फुके यांनी केली. अनिल देशमुख बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांनी जे पेन ड्राईव्ह दाखवले असे अनेक पेन ड्राईव्ह बाहेर येतील. गृहमंत्री असताना देशमुखांना काय काय घोटाळे केले हे सर्व समोर येणारच आहेत. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार असल्याचेही फुके यांनी सांगितले.