राज्याच्या विधानसभा निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजून कौल दिला. अशातच आता तिढा आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा. राज्याच्या सत्तेची चावी तर महायुतीला मिळाली, पण मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे दिसत आहे.
पण सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार, अशी माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर महायुतीतला तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तसा ठरावही राष्ट्रवादीचे सर्व मंत्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे संघानेही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.
फडणवीस आणि शिंदे समर्थकांनी कमान हाती घेतली निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीपासून दूर ठेवत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी काही मुलाखतींमध्ये असेही सांगितले होते की, यावेळी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण निकालात चांगल्या जागा मिळाल्यानंतर आता पुन्हा स्वतःला शर्यतीत ठेवत आहे. त्याचवेळी फडणवीस कॅम्प त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदानापासून सक्रिय आहे.
दुसरीकडे, शिंदे यांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना दुसरी संधी मिळावी, असे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न टाळला शिवसेना शिंदे गटाची रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
शिंदे म्हणाले, “मला एकमताने गटनेतेपदी निवडणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, त्या सर्वांना शुभेच्छा.” यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला की उद्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार का? हा प्रश्न ऐकून शिंदे यांनी तोंड फिरवले आणि ड्रायव्हरला हाताने हलवण्याचा इशारा केला.