
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पवार यांच्यानंतर त्यांचे समर्थक पदाधिकारी राजीनामा देत आहेत. चंद्रपूरचे जिल्ह्यध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सोमानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, यांनी राजीनाम्याबाबत एक निवेदन पक्षाकडे पाठविले आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार नसतील तर आम्हीसुद्धा त्या पदावर राहणार नाही.
आम्ही पवार यांच्यासोबतच आहोत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करु, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. जवळपास दहा वर्षांपासून वैद्य चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. काल (मंगळवार) मुंबईत पुस्तकाचे प्रकाशन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. याचे लोण आता जिल्हास्तरावर पोहचले आहे.