राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत देशात अनेक कटकारस्थाने शिजवली जात आहेत. देशातील बहुजन समाजाला सर्वाधिक धोका संघाकडून आहे. संघाच्या लोकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला असतानाही, अजित पवार, छगन भुजबळ आणि अन्य काही जण त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झाले आहेत.
ही भूमिका आमच्या विचारधारेच्या विरोधी आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचे एजंट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता देशात कोणत्याही पक्षात नाही. आम्ही महाविकास आघाडी व शरद पवार यांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माने म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लगेचच अजित पवारासंह काही जण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोदींनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून, हे नऊ जण त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देऊन अडगळीत टाकण्याचा त्यांचा मानस आहे.
शरद पवार हे लढवय्ये असून त्यांना शेवटपर्यत साथ देणार आहोत. संघाला पाहिजे तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत राहणार आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता पायदळी तुडवण्याचे काम संघाने केले आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडून लोकशाही धोक्यात आणली जात आहे.
देशातील ब्राह्मण समाज असुरक्षित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजप हा लोकशाहीवादी पक्ष नाही. देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपच्या मागे आरएसएसची छुपी कार्यपद्धती असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाचे पाठबळ आहे.
त्यांच्यासह अमित शहा, अदानी, अंबानी यांनी देश विकल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केला. भटक्या जाती विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस नारायण जावळीकर, प्रा. अशोकराव जाधव उपस्थित होते.