
मुंबई : महान्यूज लाईव्ह
परळीतील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो काल वायरल झाले आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी मागणी जोर धरत होती. त्यातच आज अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधक गदारोळ करण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
दोन दिवसापासून सोशल मीडियावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर पणे केलेले चित्रीकरण व त्याचे फोटो वायरल होत आहेत. संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी करताना चे फोटो व्हायरल झाल्याने आणखीनच संतापाची लाट उसळली. पुन्हा नव्याने गावागावात मोर्चे आयोजित करण्याचे मराठा क्रांती मोर्चा चे नियोजन लक्षात घेत राज्यातील परिस्थिती पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
दरम्यान फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो राज्यपालांकडे पाठवला आहे असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान धनंजय मुंडे अर्थसंकल्पाच्या अगोदरच राजीनामा देणार असे भाकीत अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी व्यक्त केले होते ते अखेर खरे ठरले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराड असल्याचे आता निष्पन्न झाले असून सीआयडी व तपास पथकांनी देखील यातील शोध घेत वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा महत्वाचा आहे. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळेच आता जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नसता, तर राज्यभरात प्रचंड वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती.