चिंचवड शहरातील एचए मैदानावर शिवपुत्र संभाजी महानाट्याचे सादरीकरण सुरू आहे. या महानाट्याचा पास फ्री मिळावा म्हणून पिंपरीतील पोलिसाने धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केला आहे.
संभाजी महाराज यांचा इतिहास कसा सादर होते ते बघतो अशी धमकी दिल्याचे अमोल कोल्हे यांनी महानाट्य सादर करत असताना स्टेजवर जाहीरपणे सांगत खंत व्यक्त केली आहे.अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याचे नाव समोर आलेले नाही. परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मान निश्चितच झुकल्याचं बोललं जातं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, पोलिस बांधव फ्री पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कसा सादर होते ते बघतो. अशी धमकी देत आहेत. गृहमंत्री यांनी त्यांना समज द्यावी. पोलिसांच्या अंगावर असलेली वर्दी केवळ अधिकाराची नाही ती जबाबदारीची आहे. याचे पोलिसांनी भान ठेवावे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे.
पुढे ते म्हणाले की, तिकीट घेऊन आलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करतो. फ्री पास हवा असेल तर या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात धावून दाखवा. अनेक जण परिश्रम घेत आहेत. आणि यांना फ्री पास हवा त्याच वाईट वाटतं अशी खंत व्यक्त केली आहे.