दरोडा तयारीच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करण्यात आलेल्या संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात घडला.
राजू ऊर्फ राजेश कांबळे असे आरोपीचे नाव आहे. राजू कांबळे याच्यावर 2015 मध्ये मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात 2010 मध्ये दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हा दाखल करून कारवाई झाली होती.
या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्याने पोलिसांचा डोळा चुकवून शिवाजीनगर न्यायालयाच्या चार नंबर गेटने पलायन केले.
याची माहिती मिळताच पथके त्याच्या तपासासाठी रवाना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.