हिंजवडी आयटी पार्कमध्ये तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मदत केंद्र

Photo of author

By Sandhya


पिंपरी : माहिती व तंत्रज्ञाननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील टप्पा (फेज) दोनमध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी; तसेच रहिवासी आणि व्यावसायिकांच्या वर्दळीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यावेळी उपस्थित होते. हिंजवडी टप्पा दोनपासून हिंजवडी पोलीस ठाणे आणि चौकीचे अंतर जास्त आहे. या भागात कंपन्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिला अभियंता कार्यरत आहेत. या परिसरात गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारती देखील असल्यामुळे वर्दळ आहे. येथील महिलांसाठी तसेच इतर नागरिकांना पोलीस मदतीची आवश्यकता भासत असल्याने पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणाऱ्या तरुण, तरुणींंसाठी पोलीस मदत केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या मदत केंद्रात २४ तास पोलीस तैनात असणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी नागरिक थेट येथे संपर्क साधू शकणार आहेत. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन या ठिकाणी विशेष पथक तैनात केले जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरेल. अपघात, चोरी, छळ किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना येथून तत्काळ मदत मिळू शकणार आहे.
माहिती व तंत्रज्ञाननगरीतील तरुणींच्या कामाच्या वेळा बदलत्या असतात. अनेकदा त्या उशिरा रात्री घरी परततात. अशा वेळी त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये. नागरिकांना देखील काही समस्या उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हे मदत केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page