राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा 9 जून सायंकाळी शपथविधी पार पडला. पण महाराष्ट्रातील महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेले नाही.
यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. म्हणून स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणे अयोग्य असल्याने आम्ही मंत्रीपद नाकारण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचे सांगितले.
प्रफुल पटेल म्हणाले, आम्हाला भाजपच्या श्रेष्ठींकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी यापूर्वी कॅबिनेट पदावर राहिलो आहे, त्यामुळे स्वतंत्र प्रभार घेणे हे मला योग्य वाटत नव्हते. त्यात भाजपच्या श्रेष्ठींची काही चूक आहे, असे मला वाटत नाही.
त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय करायचा असतो. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या वरिष्ठाकडून त्यांना सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे आम्हालाही सूचना देण्यात आल्या की, तुम्ही थोडं दिवस धीर धरा, थोडे दिवस वाट बघा.
भाजपने दुसऱ्या राज्यामध्ये कोणता निकष लावलेला आहे किंवा इतर राज्यामध्ये कोणता निर्णय घेतलेला आहे, याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये भाजपने शिवसेना आणि आम्हाला तुल्यबळ समजून निर्णय घेतला असवा. पण हेही खरं आहे की, आम्ही त्यांना सूचना करताना सांगितले आहे की, आम्हाला आज जे काही मिळत आहे, ते पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणे योग्य वाटत नाही.
त्यामुळे त्यांनी आम्हाला थोडे दिवस थांबण्यास सांगितले आहे. याचा अर्थ त्यांनी आम्हाला मंत्रीपद नाकारले आहे किंवा आमच्या पक्षामध्ये मंत्रीपदावरून वाद सुरू आहे, तर असं काही नाही. माझ्या नावाचा निर्णय आम्हाला पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून ठरवला होता.
केंद्रामध्ये आमच्या पक्षाला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा प्रफुल पटेल यांना संधी द्यावी. हा कुठलाही वादाचा विषय नाही. त्यामुळे काही दिवसांनंतर कॅबिनेट मंत्रीपदाबाबत विचार होणार असेल यासाठी आम्हाला सूचना करण्यात आलेल्या आहेत, असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.