लोकसभा निवडणुकीत डावलले गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत चारपैकी अवघ्या एका जागेवर विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अपयशातून खचून न जाता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
याबाबत पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तसे निर्देशही दिले आहेत. राष्ट्रवादीकडून ८० जागांवर दावा करण्यात आला आहे. पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यातही ८० जागा देण्याचा शब्द भाजपने दिला असल्याचे सांगत ८० जागांवर दावा केला होता.
गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांना पत्रकारांनी जागावाटपासंदर्भात विचारले असता राष्ट्रवादी पक्ष एकत्रित असताना पक्षाचे एकूण ५७ आमदार होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मागणार असल्याचे सांगितले.
महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी जागावाटपात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. सातारा आणि नाशिकच्या जागेवरून महायुतील चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाच्या मागणीने पुन्हा एकदा नाट्य रंगण्याची शक्यता आहे.
मीच मंत्री होईन केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी राज्यमंत्रिपद नाकारले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याने सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रिपद देण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे.
मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आले तर ते मलाच मिळणार, असेही पटेल यांनी या वेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.