प्रकाश आंबेडकर : “देशाचा पंतप्रधान गल्लीतल्या गुंडासारखा वागू शकत नाही, मात्र मोदी…”

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

काँग्रेस प्रेम एकाशी, लग्न दुसऱ्याशी व संसार तिसऱ्याशी करतात तर भाजप कुणाचं फुटलं, कुणाचं फाटला, कुणाचा डिव्होर्स होत आहे, डिव्होर्स होत नसेल तर घ्यायला लावतात.

तर काही घरफोडे पक्ष आहेत. सत्तेसाठी पक्ष फोडायला लागले आहे. नितिशून्य, माणुसकीहीन नितीमत्ता नसलेले पक्ष उद्या देश फोडायला मागे पुढे बघणार नाही अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर प्रचार सभा झाली. याप्रसंगी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसचे उमेदवार पळकुटे आहेत.

शरद पवार व उध्दव ठाकरे यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाजपचे की काँग्रेसचे हे कळायला मार्ग नाही तर भाजप हा फोडाफोडीचे राजकारण करीत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

लोकवर्गणीतून निवडणूका व्हाव्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. मात्र आज निवडणुकीत भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे. मोदी यांनी निवडणुकीकरिता कोणाकोणाकडून इले्ट्रोल बाँडच्या माध्यमातून निधी घेतला हे समोर आले आहे.

मात्र काँग्रेस यावर लढायला तयार नाही. बोफर्स कांडच्या नावाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बदनाम करण्यात आले. बोफर्स कांड मधून पैसे आले की नाही हे माहिती नाही मात्र बाँडचे पैसे जमा झाले ही माहिती न्यायालयाने समोर आणली आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

देशाचा पंतप्रधान गल्लीतल्या गुंडा सारखा वागू शकत नाही. मात्र, मोदी त्याच पद्धतीने वागत आहेत. रस्त्यावरच्या दादाचे व दिल्लीतल्या दादाचे वागणे एकच आहे.

रस्त्यावरच्या दादाने गल्लीत खंडणी वसूल केली तर दिल्लीतील दादा देश पातळीवर बाँड च्या माध्यमातून हे काम करीत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

ज्याने ज्याने बाँडच्या माध्यमातून भाजपला पैसे दिले त्याला इडीची नोटीस गेली आहे. कंपनीने बाँड च्या माध्यमातून हप्ता दिला आणि चौकशी थांबली अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

पंतप्रधान मोदी शाळेत गेले नाही त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही, सातत्याने खोटं बोलत असतात असेही आंबेडकर म्हणाले. काँग्रेसवाले नालायक आहेत. त्यांना वंचितला आघाडीत घ्यायचेच नव्हते.

देशात पुन्हा मोदी निवडून आले तर घटना बदलणार आहे असे भाजपचे खासदार सांगतात. आजही मोदी दररोज घटना पायदळी तुडवीत आहेत.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने आठवडाभरापूर्वी एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी भाजप पुन्हा सत्तेत आली तर २०२९ मध्ये निवडणूक होणार नाही, देशाचा नकाशा बदलला असेल, घटना बदलली असेल अशी माहिती दिल्याचेही सांगितले.

भाजपचे खासदारच मोदी घटना बदलणार असल्याचा भांडा फोड करीत आहे असेही आंबेडकर म्हणाले. मोदी व सरसंघचालक मोहन भागवत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून भेटलेले नाही.

भाजपचे उमेदवार भाजपचे आहे की नरेंद्र मोदी यांचे आहेत. मोदी यांनी भारतीय जनता पक्ष संपविला आहे. या देशातले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे प्रतीक आहे. मात्र मोदी तेच मिटवायला निघाले आहेत. काँग्रेस मुक्त देशासोबत मोदी भाजप मुक्त करायला निघाले असून एक दिवस संघ देखील संपवतील अशीही टीका केली.

संघाशी वैचारिक मतभेद आहेत. आणि ते राहणारच आहेत. मात्र संघाचे अस्तित्व ठेवायचे व टिकवायचे असेल तर मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत पाडा असा सल्लाही ॲड. आंबेडकर यांनी संघाच्या स्वयंसेवकांना दिला.

मोदी काँग्रेस संपवित असल्याचे दाखवीत असले तरी संघाला संपवित आहे. नागपूरला काँग्रेसला पाठिंबा दिला तर नाना पटोले यांना झोंबले आहे असेही आंबेडकर म्हणाले. काँग्रेस पक्ष हा भित्रा भागुबई आहे तर भाजप देशाला बुडवायला निघायला आहे तेव्हा मतदारांनी योग्य विचार करून वंचितचा उमेदवार निवडून आणावा असेही आंबेडकर म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page