प्रकाश आंबेडकर : ‘महाराष्ट्रात मणिपूरसारखं काहीतरी घडेल हे शरद पवारांचं वक्तव्य आग लावणार…’ 

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला संबोधित करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडू शकत आणि मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी  शरद पवारांचं हे वक्तव्य आग लावणारं आहे असं म्हणत टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,’मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद लावण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. शरद पवारांचं स्टेटमेंट आलं महाराष्ट्राचा मणिपूर करु नका. त्यांचं हे वक्तव्य आग लावणारं आहे.

उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा आणि जागा वाढवून घ्या त्यानंतर मराठ्यांना ओबीसीत घेऊ आणि आरक्षणाकडे नेऊ.’

ते पुढे म्हणाले,’ हे बोलणं चिथावणी देणारं आहे. अशी अनेक वक्तव्यं येत आहेत, ज्यातून चिथावणी मिळते आहे. मात्र जनतेचं कौतुक करेन की राजकीय मतभेदांमध्ये जनता पडत नाही. आमचं जनतेला आवाहन आहे, गरीब मराठ्यांना आवाहन आहे की आम्हाला ओबीसींबरोबर सत्तेवर बसवा आम्ही सत्तेत आलो की आम्ही आरक्षणावरचा मार्ग काढू.

मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असेल.’ असंही प्रकाश आंबेडकरांनी  स्पष्ट केलं. तत्पूर्वी शरद पवार म्हणाले होते की,मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे.

परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं अंसं वाटलं नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही.

मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल, अशी चिंता आता वाटू लागली आहे.

सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

Leave a Comment