‘‘श्रीमंत विरुद्ध गरीब मराठ्यांच्या भांडणात ओबीसींना बळीचा बकरा बनविला जात आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसीचे अधिकाधिक आमदार निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यातून सत्तेत सहभागी व्हा आणि स्वतःचे आरक्षण वाचवा,’’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
‘वंचित’च्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा आज येथे समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत आंबेडकर बोलत होते. ओबीसी विरुद्ध मराठा वादामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आपल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे निवळली, असा
दावा त्यांनी केला. २२ जिल्ह्यांतून ही चार हजार किलोमीटरची यात्रा काढण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. ‘‘आरक्षणाचा प्रश्न आता सामाजिक नव्हे तर राजकीय झाला आहे.
त्यातून मार्ग काढावा लागेल. पण दुर्दैवाने कोणी भूमिका घ्यायला तयार नाही’’ अशी टीका आंबेडकर यांनी महाविकास आघाडी, महायुतीवर केली.