भाजपाकडून सध्या ४०० पारच्या गर्जना दिल्या जात आहेत. मात्र त्यांना ४०० पार करायचं की नाही? हे मतदारांनी ठरवायचं आहे. त्यांच्याकडून मोठमोठ्या वल्गना केल्या जातील, आश्वासनं दिली जातील, घोषणा दिल्या जातील. पण तुम्ही मतदार आहात.
मतदार जे ठरवतील तेच होणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाषण केलं त्यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली.
मतदारांनी आता ठरवायचं आहे की..
मतदारांनी हे ठरवलं पाहिजे की सेक्युलर विचारांचं सरकार आता येणार आहे. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. मात्र धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे लक्षात घ्या असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
सध्या असं सांगितलं जातं आहे की आम्ही चांगल्या प्रशासनाची हमी देतो असं सांगत आहेत. मात्र मागच्या दहा वर्षात बेरोजगारी वाढली त्याची हमी दिली जाते आहे. मनोज जरांगेंना आरक्षण देतो असं सांगण्यात आलं. मात्र ते इथून निराशा घेऊन गेले. हे सरकार फसवणुकीची हमी देतं आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातधार्जिणे
प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातधार्जिण्या भूमिकेवर टीका केली. तसंच महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगांवरही त्यांनी टीका केली. आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला.
“नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा.
मला माहिती आहे की, तुम्हाला या गोष्टी पचवणे कठीण आहे. पण इथले कारखाने पळवलेत की नाही? मग उद्या पुन्हा ते पळवले जातील. मतांच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचं लायसन्स द्याल. त्यामुळे भाजपला मतदान करु नका” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
तर सगळा देश कर्जबाजारी होईल
मागच्या दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारच्या कारभारामुळे प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे. एखाद्याला १० हजार पगार असेल आणि बँकेला हप्ता म्हणून १० हजार रुपये द्यावे लागत असतील तर शिल्लक राहतं का काही? मग माणूस घर-दार विकायला काढतो. मोदी आणि आरएसएसला परत निवडून दिलं तर २०२६ मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल.
जगण्यासाठी दारुडा जसा भांडी विकतो, फर्निचर विकतो आणि मग शेवटी घर विकतो आणि रस्त्यावर येतो. भाजपाकडे सत्ता गेली तर अशीच वेळ येऊ शकते. माझं भाजपाला आव्हान आहे मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्हाला कर्जात डुबायचं नसेल तर तुमचं मत भाजपाच्या विरोधात दिलं पाहिजे.
मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर २४ रुपयांचे कर्ज होते. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा ८४ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. असाही आरोप आपल्या भाषणांत प्रकाश आंबेडकरांनी केला.
आपण हुकूमशहा निर्माण केला आहे
देशात तपासयंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहेत. मागच्या दहा वर्षांत सरकारने किती धाडी घातल्यात याचे हे जरा आकडेवारी देऊन सांगितलं पाहिजे. धाडी घालणे तुमचा अधिकार आहे.
पण त्यापैकी कितीजणांना कोर्टाने शिक्षा सुनावली? उलट असं दिसतंय की, गंगेत स्नान केल्यासारखा चोर भाजपमध्ये साफ होऊन जातो. देशाची व्यवस्था एवढी बिघडवलेय की, कोर्टाला म्हणावं लागलं की मीच आता निवडणूक अधिकारी.
चंदिगडमध्ये भाजपाने काय केलं? भय निर्माण केलं. कोर्टातदेखील अधिकारी खरं बोलत नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मतं मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता, हे स्पष्ट झाले. आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.