सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होतील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सध्या तरी असेच चित्र दिसत असून, तसे झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील.
आता या दोघांच्या चुरशीत कोण जिंकणार हा प्रश्न आहे, असेही वक्तव्य आंबेडकर यांनी एका मुलाखतीत केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकद़ृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आले आहे.
म्हणूनच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. राज ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रमुख होतील.
भाजपने या निवडणुकीत जी योजना आखली आहे, त्याकडे थोडे गांभीर्याने बघितले पाहिजे, असे सांगताना आंबेडकर म्हणाले, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत थोडी मवाळ भूमिका घेतली आहे.