लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून बैठकींचे सत्र सुरु आहे. अशात महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजूनही फायनल यादी तयार झालेली नाही. अशात काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला.
यानंतर मविआकडून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्षाला योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार वंचितच्या काही नेत्यांनी केली. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनीही मविआच्या नेत्यांनावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,’महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झालेलं नाही.
चारही पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी संघर्ष सुरु आहे. जागावाटपासाठी नुसत्या चर्चा चालू असून मविआ नेते अद्याप त्यातून कुठलाही निष्कर्ष काढू शकले नाही.’ असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे अशात आता भाजपाही प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करते आहे.
यामुळे येत्या निवडणुकीत वंचित माविआ सोबत राहील कि नाही असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्त्यव्य वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ‘आम्ही सुधारणांमध्ये विश्वास ठेवतो. समाज सुधारणं ही आमची प्राथमिकता आहे.
राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना आमचे काही राजकीय अजेंडे असले तरी आमच्यासाठी सामाजिक सुधारणा अधिक महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले, देशातील जातीवर आधारित चालेली पुरोहितशाही कायद्याने पूर्णपणे बंद व्हावी. यावर सरकारने बंदी घालायला हवी.
त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी (ब्रह्मज्ञान) उभं केलं जावं आणि तिथून शिकून, उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे.
धार्मिक विधी त्याच्यामार्फतच केले जायला हवेत. आरएसएस आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू शकतो.’