
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांत जागा वाटपावरून मतभेद आहेत. त्यामुळे अगोदर त्यांच्यामध्ये तोडगा निघणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वंचित आघाडीसाठी प्रयत्न करणार आहे.
असे असले तरीही आमच्याकडे ४८ जागांचा पर्यायही खुला आहे, अशी गुगली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टाकली. येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, ‘‘राज्यातील महाविकास आघाडीसोबत वंचितची आघाडी होणार का? वंचितने किती जागा मागितल्या? हा मुळात प्रश्नच नाही. वंचितची तयारी तर सर्व म्हणजे ४८ जागांवर आहे.
राज्यात महाविकास आघाडीच राहते किंवा नाही? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहणार आहोत. आघाडी झाली नाही, तर या तिघांपैकी जो कोणी आमच्यासोबत येईल त्यांच्यासोबत निवडणुका लढविणार’’, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘‘भाजपच्या विरोधात असलेले सगळे पक्ष स्वतंत्र लढले तर भाजप २२ टक्क्यांच्या वर मते घेऊ शकणार नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना त्यांची त्यांची मते मिळतील. ती सगळी हिंदूंची मते आहेत. भाजपला केवळ कट्टर धार्मिक मते जातील.
दलित मते आम्हाला मिळतील’’, असा दावाही आंबेडकरांनी केला. ‘‘ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते संजय राऊत हे तीनही पक्षांचे वकीलपत्र घेतल्यासारखे बोलत आहेत. काँग्रेसला आपण पाठविलेल्या पत्राचे अद्याप काहीही उत्तर आलेले नाही’’, अशी माहिती त्यांनी दिली.