उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे की शिवसेनेचे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पवार गटाशी बिनसल्यास उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित लोकसभेच्या 48 पैकी प्रत्येकी 24 – 24 जागा लढेल, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचितचा समावेश इंडिया आघाडीत करण्याचा निर्णय होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व 48 जागा स्वबळावर लढवाव्या लागतील, असा इशारा महाविकास आघाडीला दिला होता.
मात्र, त्यांनी सोमवारी नवा फॉर्म्युला उघड केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे काहीच झाले नाही तर मग उद्धव ठाकरे आणि वंचित फिफ्टी-फिफ्टी लढेल, पण त्यांचे जागा वाटप ठरले तर मग फॉर्म्युला वेगळा होईल आणि कोणाचे काहीच झाले नाही तर सर्वांनी वेगळे लढावं लागेल. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही स्वतंत्र लढावे लागेल. आम्हीही 48 जागा लढवू, असे आंबेडकर म्हणाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीला किमान 15 जागांवर फटका बसला होता. यावेळी वंचित स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडीपुढे मतविभाजन टाळण्याचे मोठे आव्हान असेल.