प्रणिती शिंदे : “नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायको ऐकत नाही तर; ‘लाडकी बहीण’…?”

Photo of author

By Sandhya

प्रणिती शिंदे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक या वर्षी होणार आहे. या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही तरीही दिवाळीनंतर निवडणूक लागेल अशी चिन्हं आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना यावेळी रंगणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महायुतीचा महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यामुळे त्यांनीही विधानसभा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या सगळ्या धामधुमीत एका योजनेची चर्चा रंगली आहे. ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना.

लाडकी बहीण योजना चर्चेत- लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती आहे, निवडणूक झाल्यानंतर ही योजना महायुती सरकार आलं तर ते बंद करेल असं महाविकास आघाडीचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. तर दुसरीकडे सावत्र भावांपासून सावध राहा असा टोला महायुतीचे नेते मविआला लगावत आहेत. ही योजना पुन्हा चर्चेत येण्याचं कारण आहेत खासदार प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदेंनी एक जोक सांगून या योजनेवरुन सरकारची फिरकी घेतली आहे.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या? – प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं. सोलापूर माझं गाव असलं तरी संगमनेर माझ्यासाठी घरच आहे. मी आमदार, खासदार झाले मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम मी सुद्धा करू शकले नाही. गृहिणी खूप हुशार आहेत.

मात्र त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभे राहिले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेवरुन टोला – लाडकी बहीण योजनेवरुन प्रणिती शिंदेंनी टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायका ऐकत नाहीत. तर यांचं कोण ऐकणार?” हा प्रश्न विचारत लाडकी बहीण योजनेवरुन प्रणिती शिंदेंनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.

संगमनेर या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात इंदिरा गांधी महोत्सव घेण्यात आला. त्यावेळी प्रणिती शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरुन टोला लगावला.

आणखी काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? – “जे सरकार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करु शकतं त्यांच्याबाबत काय बोलणार? बदलापूरच्या घटनेतही लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. अघोषित आणीबाणी निर्माण झाली आहे.

निवडणूक व्हायला हवी होती. पण ती पण झालेली नाही. शिवाजी महाराजांचा निकृष्ट दर्जाचा उभारला होता. प्रताप गडावर पंडीत नेहरुंनी अनावरण केलेला पुतळा अद्यापही मजबूत आहे. मात्र आठ महिन्यांत राजकोटचा पुतळा कोसळला. कारण या सरकारने यातही पैसे खाल्ले” असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला आहे.

Leave a Comment