पुणे : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करत आहेत. सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे, राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्द्ल की खेळाबद्दल आहे? की भावनेच्या संदर्भात आहे? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाही. हर्षद पाटील यांच्या ‘सी व्हेवज’ निर्मितीसंस्थे अंतर्गत राजू मेश्राम लिखित, दिग्दर्शित “अर्धा वाटा” या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरु आहे.
‘पावर’, ‘झरी’, ‘लव्ह बेटिंग’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ सारख्या आशयघन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक, दिग्दर्शक राजू मेश्राम “अर्धा वाटा” सिनेमाबद्दल सांगतात कि, हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे, अर्धा वाटा, हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे, कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच असतो, मात्र या सिनेमात ‘अर्धा वाटा’ नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवलं आहे. नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा हे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘धर्मवीर’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक, यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रसाद सिनेमाबद्दल सांगतात कि, सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच क्षणी मी सिनेमात काम करण्यास होकार दिला. मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला, सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवला आहे, भावबंधाचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी ठरू शकेल, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे.
मृण्मयी देशपांडे सांगते कि, एवढ्या वर्षात एकाच क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेले नाही, त्यामुळे मी खूप खुश आहे कि, आम्ही दोघे एकत्र काम करतोय. माझ्यासाठी सुरवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सीनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, आजवर प्रेक्षकांनी मला अशा रुपात बघितले नाहीये. अशाप्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवे, आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी ‘अर्धा वाटा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला.
मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात, “अर्धा वाटा” सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात शंका नाही.