खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरु

Photo of author

By Sandhya

Preparations for the ‘Hind-Di-Chadar’ program at Kharghar have begun in Pune district.

गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १२ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) : नवी मुंबई येथील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “हिंद-दी-चादर” या भव्य कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश दृढ करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
आज जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी यांच्या बरोबर जिल्हाधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नागपूर व नांदेड येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडले असून, आता खारघर येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून कार्यक्रम सुरळीत, प्रभावी व सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडावा. सामाजिक ऐक्य, सेवा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती, पोलीस व परिवहन विभाग तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यक्रमाची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेषतः सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासिन व भगत नामदेव परंपरा-समाजाची लोकसंख्या ज्या भागात अधिक आहे, त्या ठिकाणी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सांस्कृतिक अंगाला अधिक प्रभावी करण्यासाठी भक्तीगीतांचे सादरीकरण तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये निबंध, वक्तृत्व, स्पर्धा परीक्षा व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाची प्रेरणा रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागामार्फत “आरोग्य पंधरवडा” राबवून विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, प्रत्येक विभागाने राबविलेल्या कार्यक्रमांची Geo-tagged छायाचित्रे व सविस्तर अहवाल अधिकृत संकेतस्थळावर नियमित अद्यावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त होणारा हा “हिंद-दी-चादर” कार्यक्रम समाजात बंधुभाव, एकात्मता आणि सेवा भावनेचा जागर निर्माण करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी आवाहनात नमूद केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page