महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रूपये दिले जात आहेत, मात्र महिन्याचा घरातील खर्च १५०० रूपयांमध्ये होतो का? बहिणींनी सतर्क झालं पाहिजे. दहा वर्ष सरकार असताना आताच का निर्णय घेतला.
निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिंणींना पंधराशे रूपये दिले जात आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी यांची शिर्डी येथे शनिवारी सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी यांच्याकडून वदवून घ्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांना दिले होते. याला उत्तर देत विचार वेगळे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाला अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते शिवरायांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी संसदेच्या बाहेरील शिवरायांचा पुतळा हटवला. सिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, कारण पुतळा बनवतानाच भ्रष्ठाचार झाला होता. शिवरायांचा अपमानच करणार असाल, तर नाव घेऊन काय उपयोग? काँग्रेसचा कुठलाच नेता छत्रपती शिवाजी महाराचांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
जातनिहाय जनगणना कधी करणार? आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कधी वाढवणार? अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा कधी उभारणार ? या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी द्यावीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही.
कापूस उत्पादक, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. कोणतीही वस्तू घेतली तर जीएसटी वसूल केला जातो. युवकांना नोकऱ्या नाहीत. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. महाराष्ट्रातील उद्योग मात्र दुसऱ्या राज्यात पळविले जात आहेत. महाराष्ट्राला कमजोर केले जात आहे, असा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी राज्यातील महायुती सरकारसह केंद्र सरकारवर केला.