महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताबदल अटळ आहे. त्या निकालांचा परिणाम केंद्रातील मोदी सरकारच्या स्थैर्यावर होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमधील सत्तेतून भाजपला पायउतार व्हावे लागेल. दोन्ही राज्यांतील सरकारे बदलल्याचा थेट परिणाम केंद्र सरकारवरही होईल.
ते सरकार आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील एकूण ४८ पैकी ६५ टक्के जागा जिंकल्या. म्हणजेच, विधानसभेच्या एकूण २८८ पैकी १८३ जागांवर आघाडीने वर्चस्व मिळवले. ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी चांगली कामगिरी करेल.
महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांकडे महायुती सरकारने दुर्लक्ष केले. ते सरकार बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणांत जबाबदारी टाळू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
महायुती सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले. काहीच दाखवण्यासारखे नसल्याने ते सरकार लाडकी बहीण योजना घेऊन आले. लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीमुळे सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली. राज्यात २०१४ पासून ५ वर्षे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.
त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची योजना आणली गेली नाही. आता भाजपच्या गोटात धास्तीचे सावट पसरले आहे. त्या पक्षाला लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतं मिळतील असे वाटते. पण तसे घडणार नाही, असे भाष्य चव्हाण यांनी केले.