पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवर असलेल्या पुलावरून भरधाव स्कॉर्पिओ जीप कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोघे किरकोळ जखमी झाले.
ही घटना शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. जीपचालक सुरेश गोविंद दाते (वय 58, रा. काठापूर खुर्द, ता. शिरूर) व नारायण डोके (वय 50, रा. शिंगवे, ता. आंबेगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पारगाव शिंगवेहून काठापूर खुर्द येथे स्कॉर्पिओ जीप (एमएच 12 एचएल 4263) जात होती. जीपमध्ये चालक सुरेश दाते व नारायण डोके हे दोघे होते. घोडनदीवरील पुलावर दातेचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप थेट पुलावरून खाली कोसळली.
यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले. तर जीपचे मोठे नुकसान झाले आहे.दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.