पुणे चांदणी चौक पुलासंदर्भात महत्वाची बातमी; पूल ऑगस्टमध्ये होणार खुला

Photo of author

By Sandhya


पुणे चांदणी चौक पुलासंदर्भात महत्वाची बातमी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौक पुलाचे उद्घाटन 1 मे ला होईल, अशी घोषणा केली होती; परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने उद्घाटनाचा तो मुहूर्त टळला. मात्र, आता काम अंतिम टप्प्यात असून, 12 ऑगस्टला गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौकातील कामांची शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी पाहणी केली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.

त्यांच्यासोबत प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उभारण्यात येणार्‍या चांदणी चौकातील उड्डाणपूल, सेवा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवरील एकूण 32 गर्डर (गर्डर लांबी 22 ते 35 मी.) आहेत.

मुख्य रस्त्यावर 9 गर्डर (गर्डरची लांबी 57.5मी) आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सेवा रस्त्याच्या 4 स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू आहे.

रखडलेल्या भूसंपादनाविषयी बैठक वेद भवन येथील भूसंपादनाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासंदर्भात चर्चेसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page