PUNE CRIME : दरोडा टाकून चोरी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना बेड्या

Photo of author

By Sandhya

दरोडा टाकून चोरी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना बेड्या

मटन विक्रीच्या दुकानात लागणारे बकरे आणण्यासाठी आपल्या कर्मचार्‍याबरोबर जात असलेल्या व्यावसायिकाला इंद्रायणीच्या पुलावर दरोडा टाकून टोळक्याने अडीच लाखांची रोकड चोरी केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत दरोडा टाकणार्‍या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

कुणाल राजू खाडे (19), अक्षय उर्फ मनोहर कसबे (22), सचिन बाबूराव सोळंके (26), मुकेश काशिनाथ जाधव (23) आणि स्वयम गणेश माने (19, सर्व रा. वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत रियाज चांदभाई मुलाणी (41, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 जून रोजी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तुळापूर आळंदी-रोडवरील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ घडला.

या वेळी आरोपींनी हत्यारांचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या सूचनेनुसार, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, अंमलदार बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, अजित फरांदे, कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव यांच्या पथकाने फिर्यादींच्या घरापासून तांत्रिक विश्लेषण सुरू केले.

वाडेबोल्हाई ते येरवड्यापर्यंत तसेच वडगाव शेरी येथील सीसीटीव्हींची तपासणी केली असता, गुन्ह्यात एकूण सहा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना सापळा रचून वडगाव शेरी येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात चोरीला गेलेल्या रकमेपैकी 93 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता विजयसिंह जाधव यांनी पाचही जणांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्यांना 12 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मौजमजेसाठी लूटमार गुन्ह्यातील मास्टर माईंड हा पकडण्यात आलेला देवा हा असून, त्यानेच इतरांबरोबर कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा घडल्यानंतर तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. त्यांनी केलेला हा पहिला गुन्हा असून, मौजमजेसाठी दरोडा टाकल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक मारुती पाटील करत आहेत.

Leave a Comment