पेन्शनमधील फरकाच्या रकमेची माहिती ऑनलाइन घेत असताना सायबर चोरट्याने संपर्क करून एका ज्येष्ठाची 6 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी गणेशखिंड रोड येथील 72 वर्षीय ज्येष्ठाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा पेन्शन फरकाची रक्कम बँकेत प्रलंबित होती. त्याची माहिती ते ऑनलाइन घेत होते. त्या वेळी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला.
त्यानंतर विश्वास संपादन करून स्क्रीन शेअरचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी 6 लाख 97 हजार रुपये काढून घेतले. याबाबत फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.