पारधी समाजाची महिला जेवण आणायला म्हणुन गेली. पण, सकाळी जळलेल्या अवस्थेतच मिळून आल्याने महिलेची हत्या की आणखी काही हे आता शवविच्छेदन झाल्यावरच समोर येणार आहे; मात्र तोपर्यंत या घटनेचे गुढ कमालीचे वाढले आहे.
वैशाली कल्याण काळे (वय ४०, रा. भकासवाडी-मदनवाडी, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव असुन बहीण शालन काळे हिने पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे.
याची थोडक्यात माहिती अशी की, वैशाली काळे या महिलेचा मृतदेह भकासवाडी येथे राहत्या घराच्या जवळच जळालेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. ६) सकाळी आढळून आला.
बहिण शालन यांच्या फिर्यादीनुसार वैशाली ही सोमवारी (दि. ५) रात्री जेवण घेऊन येते असे सांगुन गेली, मात्र ती परत आली नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत घराजवळच आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
महिलेची हत्या करून तिला जाळले की आणखी काही याबाबत संभ्रम असल्याने तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याचा उलगडा होईल आणि त्यावर तपासाची दिशा ठरेल, अशी माहिती पवार यांनी दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत.