PUNE : धरणांत वर्षभर पुरेल एवढे पाणी तरीही पुणेकरांच्या नशिबी पाणीकपात

Photo of author

By Sandhya

PUNE : धरणांत वर्षभर पुरेल एवढे पाणी तरीही पुणेकरांच्या नशिबी पाणीकपात

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत 17.21 टीएमसी म्हणजे 59.03 टक्के पाणीसाठा असून, हे पाणी पुणेकरांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढे आहे, असे असतानाही शहराची पाणीकपात सुरूच ठेवण्यात आल्याने टँकरधारकांकडून नागरिकांची लूट केली जात आहे.

दरम्यान, 1 ऑगस्टनंतर धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस पडला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर, गेल्या काही दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील एकूण पाणीसाठा हा सात टीएमसीने वाढला आहे.

आजपर्यंत खडवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा हा 17.21 टीएमसी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी आहे. गेल्या वर्षी 20.48 टीएमसी इतका पाणीसाठा होता.

पाऊस वाढल्यास धरणांतील साठा वाढू शकतो. सध्या खडकवासला धरणसाखळीत पुणेकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणीकपात सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होणार्‍या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.

या टँकरसाठी नागरिकांना जास्त रक्कम मोजावी लागत आहे. महापालिकेचे सुमारे साडेपाचशे टँकर असून, खासगी दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page