पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत जवळपास पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे. शनिवारी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात 14.56 टीएमसी (49.86 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाखळीत साडेचार टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली आहे. गेल्या 18 जुलै रोजी प्रकल्पात 10.09 टीएमसी इतका पाणीसाठा होता.
रायगड जिल्ह्यालगतच्या तव, धामण ओहोळ, दापसरे टेकपोळे खोर्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे परिसरातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे.
शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या टेमघर येथे 25 मिलिमीटर, वरसगाव येथे 17 ,पानशेत येथे 25 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी 22 जुलै रोजी धरणसाखळीत 20 टीएमसी (68.61 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
खडकवासला धरण पाच दिवसांत भरणार? सिंहगड, खडकवासला भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, पानशेत व वरसगाव धरणाखालील खडकवासला धरणक्षेत्रातील आंबी, मुठा, मालखेड, रांजणे, खामगाव भागातील ओढ्या-नाल्यांचे प्रवाह वेगाने वाहत आहेत.
त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीपातळी 62 टक्क्यांवर गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या पाच दिवसांत खडकवासला धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.