पुणे | न्यायालयासमोर लायटरचा स्फोट; हातगाडीवरील घटना

Photo of author

By Sandhya

पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला भाजले तर हातगाडीचालकही जखमी, मोठी दुर्घटना टळली

पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटरचा स्फोट झाला. यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार आणि हातगाडीचालक जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

नीलेश सुभाष दरेकर असे जखमी अंमलदाराचे नाव आहे. हातगाडीचालक संतोष सोनवणे हादेखील जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पोलीस अंमलदार यांना गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर येथे कोर्ट येथे कर्तव्य होते. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी न्यायालयासमोरील एका हातगाडीजवळ गेले. त्यावेळी अचानक लायटरचा मोठा स्फोट झाला.

यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. तर हात गाडी चालकाचे केस जळाले तसेच चेहरा आणि कान भाजला आहे. जखमींना पोलीस कर्मचाऱ्यावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पुणे न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावल्या जातात. यातील काही हातगाड्या परवानाधारक आहेत. तर अनेक हातगाड्या या बेकायदा लावल्या जातात. दुपारी २ ते ३ या वेळेत न्यायालयाची जेवणाची सुट्टी असते. न्यायालयात कामानिमित्ताने तारखेला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यातील अनेकजण या वेळेत येथील हातगाड्यांवरील विविध खाद्यपदार्थ, वडापाव खाण्यासाठी, चहा किंवा जेवणासाठी येत असतात. न्यायालयाच्या क्रमांक तीनच्या गेटवर वडापावची ही हातगाडी आहे.

या गाडीवर शंभरहून अधिक नागरिकांची गर्दी असते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारात पोलीस कर्मचारी दरेकर हे वडापाव खात असताना हातगाडीवर ठेवल्या गॅस शेगडीजवळ उभे होते. दुपारची वेळ आणि तापलेले तेल यामुळे सिगारेट पेटवण्यासाठी लावलेला लायटर गरम झाला होता.

लायरमध्ये भरण्यासाठी आणलेले लिक्वीडदेखिल गॅस शेगडीच्या जवळच ठेवण्यात आले होते. गरमीमुळे त्याचा अचानक स्पोट झाला. यामुळे मोठा भडका उडाला. या भडक्यात हे पोलीस कर्मचाऱ्यासह हातगाडीचालक जखमी झाले.

ही घटना घडताच न्यायालयातील वकिलांसह पोलिसांची गर्दी घटनास्थळी झाली होती. शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हातगाडीवरील गॅस शेगडी तसेच इतर साहित्य जप्त केले. या हातगाडीच्या शेजारी असलेल्या इतर हातगाड्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. त्यानंतर पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही हातगाडीचालकाने व्यवसाय करु नये. अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिल्याचे हातगाडीचालकाने सांगितले.

पथारी व्यावसायिकांना महापालिकेकडून परवाना दिला जातो. परवाना देताना कोणत्याही व्यावसायिकाने रस्त्यावर हातगाडी लावताना केवळ खाद्यपदार्थांची विक्री करु शकता, असे स्पष्ट नमूद करण्यात आले असते. परंतु पथारी व्यावसायिकांकडून या नियमाला हारताळ फासला जात आहे. हातगाडीवर खाद्यपदार्थ तयारदेखील केले जातात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची केवळ आर्थिक गणिते जुळवून कारवाई केल्याचा देखावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नसल्याचे येत आहे. या घटनेनंतर अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांनी न्यायालयाच्या आवारातील बेकायदा हातगाड्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात हातगाड्या लावल्या जात आहेत. सदर प्रसंग घडलेल्या हातगाडीवर नेहमीच मोठी गर्दी असते. तसेच शेजारी पाच ते सहा हातगाड्या आहेत. या रस्त्यावर अनेक हातगाड्या आहेत. या प्रत्येक हातगाडीवर गॅस सिलेंडरच्या टाक्या असतात. लायटरच्या स्फोटात जर गॅस सिलेंडरचा भडका उडाला असता तर मोठी जिवित हानी झाली असती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. पण भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी कायमस्वरुपी मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment