PUNE : मेट्रोला स्वारगेटपर्यंत जाण्यासाठी लागणार आणखी पाच महिने…

Photo of author

By Sandhya

मेट्रोला स्वारगेटपर्यंत जाण्यासाठी लागणार आणखी पाच महिने

 बहुप्रतिक्षित असलेल्या मेट्रोचा प्रवास मागील वर्षी सुरू झाला. पहिल्या टप्प्यात मेट्रो पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यान धावली. त्यानंतर 1 ऑगस्टपासून मेट्रोने सिव्हिल कोर्टापर्यंतच पल्ला गाठला आहे.

पुढील टप्प्यात ती पिंपरी ते स्वारगेटपर्यंत धावणार असून यासाठी मार्च 2024 उजाडणार आहे. त्यानंतर पिंपरीहून स्वारगेटपर्यंतचा प्रवास पिंपरी चिंचवडकरांना थेटा येणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात मेट्रोच्या तीन मार्गिकांपैकी एका मार्गिकेचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वनाज ते रामवाडीपर्यंत पुणेकरांना थेट प्रवास करता येणार आहे.

तर, त्यानंतरच्या टप्पा म्हणजे पिंपरी ते स्वारगेट अर्थात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गिकेसाठी मार्च 2024 उजाडणार आहे. खडकी येथील भूसंपादन उशिरा झाल्याने सिव्हील कोर्टापर्यंतच्या मार्गिकेसाठी व प्रवासासाठी 1 ऑगस्ट 2023 उजाडले. त्यानंतर आता सिव्हील कोर्ट ते स्वारगेटचे काम प्रगतीपथावर आहे.

मेट्रोचे पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही मार्ग सुरू झाले आहेत. त्यात पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल हा मार्ग सुरू झाला आहे.

याद्वारे प्रवासी सेवादेखील सुरू झाली आहे. उर्वरित रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गावर वेगाने काम सुरू असून, डिसेंबर 2023 अखेरपर्यंत रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि मार्च 2024 अखेरपर्यंत सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक हे मार्ग प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात येतील, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

आतापर्यंतचे काम पहिला टप्पा – मार्च 2022 ः पीसीएमसी ते फुगेवाडी स्थानके ः पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी दुसरा टप्पा – ऑगस्ट 2023 ः फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानके ः फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट

उर्वरित टप्पे तिसरा टप्पा – डिसेंबर 2023 ः रुबी हॉल ते रामवाडी – 6 किलोमीटर स्थानके ः बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी चौथा टप्पा – मार्च 2024 सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट – 5 किलोमीटर स्थानके ः बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट

Leave a Comment

You cannot copy content of this page