पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वीकेंडला मुंबईहून बाहेर पडणार्या आणि पुण्याहून मुंबईला जाणार्या वाहनांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्या पार्श्वभूमीवर ठोस उपायोजना करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे.
महामार्ग पोलिसांकडून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) शनिवारी आणि रविवारी दिवसातून पाच वेळा ठिकठिकाणी ब्लॉक घेण्यात येत आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहनांना अतिरिक्त लेन उपलब्ध करून दिली जात आहे.
या ब्लॉकमध्ये एका बाजूने होणारी वाहतूक काही वेळ थांबवून दुसर्या बाजूने येणार्या वाहनांना रस्ता देण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गावर होणारी कोंडी सुटण्यास मदत होत आहे.
पुणे-मुंबईदरम्यान वीकेंडला प्रवास करताना वाहनचालकांच्या नेहमीच नाकीनऊ येत असते. त्यातच महामार्ग पोलिसांकडून करण्यात येणार्या या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींदर सिंगल यांच्यासह महामार्ग पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
तसेच, डॉ. सिंगल यांनी घाट रस्त्यावर येणार्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली आहे. शनिवारी, रविवारी असे आहे नियोजन पुणे लेनला 44-100 किलोमीटर जवळ एक कट आहे तेथून वाहने मुंबई लेनला डायव्हर्ट केली जातात. त्याच वेळी मुंबई लेनने येणारी वाहतूक 15 मिनिटे खंडाळा टनेल जवळ थांबविली जाते.
मग खंडाळा टनेलजवळ 46-800 किमी येथे डायव्हर्ट केलेली वाहतूक पुन्हा पुणे लेनला जोडली जाते. या वेळी 1200 ते 1500 चारचाकी गाड्या पास होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे.